Summer Weather Update : (Maharashtra Summer) महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात असणारी थंडीची लाट आता परतताना दिसत असून, अनेक भागांमधील तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. फेब्रुवारी (February) महिन्यातच उन्हाच्या झळांमुळं सर्वसामान्य नागरिक त्रस्त होताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिना संपलाही नसताना तापमानाच झालेली वाढ पाहता आणखी चार महिनेहा उन्हाळा किती तीव्र होणार? या प्रश्नानंच अनेकांना धडकी भरत आहे.
महाराष्ट्रासह गुजरात (Gujrat) आणि गोव्यामध्ये (Goa) पुढील काही दिवसांत कापमान तब्बल 37 ते 39 अंशांमध्ये असेल अशा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या तापमानामुळं नागरिकांना त्रास होऊ शकतो. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान उन्हाडा कडाका जास्त असल्यामुळं यादरम्यान गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असाही इशारा अभ्यासकांनी दिला आहे.
येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार असून यंदाचा उन्हाळाही दीर्घकाळ टिकणारा असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईकरांसह राज्यातील इतरही भागात असणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुणे (Pune City) शहरात असणाऱ्या कोरेगाव पार्क भागातील कमाल तापमान सलग दहाव्या दिवशी 37.5 अंशांवर पोहोचल आहे. 9 फेब्रुवारीला इथं 37 तर 12 तारखेला 38.4 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली होती. ही आकडेवारी पाहता शहर आणि जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी किमान तापमानासोबतच कमाल तापमानाचीगी विक्रमी नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली. 2023 या संपूर्ण वर्षात उन्हाळ्याची सुरुवात राज्यातील कोकण, विदर्भ किंवा मराठवाड्याच होण्याआधीच उन्हाच्या झळांनी पुणेकरांना घाम फोडला आहे.
देशातील ज्या भागात थंडीचा कडाका जाणवत होता त्या चंदीगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रकेशात आता दिवसा उन्हाचा तडाखा बसताना दिसत आहे. फेब्रुवारीमध्येच हिमाचलमध्येही सूर्य आग ओकू लागल्यामुळं गेल्या काही दशकांतील तापमानाचा विक्रम मोडला गेला आहे. दरम्यान या भागात पुढील काही दिवसांमध्ये पश्चिमी वाऱ्यांमुळं हवामानात काही बदल अपेक्षित असतील असंही सांगण्यात आलं आहे.