Supreme Court Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाव आणि पक्ष चिन्हावरुन देण्यात आलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या खटल्यात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 14 मार्च रोजी शेवटची सुनावणी झाली होती. आज होणाऱ्या सुनावणीमध्ये अजित पवार गट घड्याळ या पक्षचिन्हाबद्दल न्यायालयाला काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर गुरूवारी म्हणजेच 14 मार्च रोजी सुनावणी पार पडली होती. यावेळी शरद पवार गटाच्या वतीने अजित पवारांचा पक्ष शरद पवार यांचा फोटो वापरतो असा आक्षेप घेतला होता. यावर न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले होते. तुम्ही 16 मार्चपर्यंत 'आम्ही शरद पवारांचा फोटो वापर नाही असं लिखित द्या,' असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला दिला होता. त्यानुसार अजित पवार गटाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात शनिवारी, 16 मार्च रोजी प्रतिज्ञापत्र सादर करत शरद पवारांचा फोटो वापरणार नाही असं न्यायालयामध्ये सांगितलं आहे.
आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय अजित पवार गटाला आणखीन एक धक्का देऊ शकतं. अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचं मूळ चिन्ह म्हणजेच घड्याळ दिलं असलं तरी आधीच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने पक्षचिन्हाबाबतीत वेगळा विचार करावा असं सुचवलं होतं. सर्वोच्च न्यायालयामध्ये 14 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला तुम्ही गोंधळ टाळण्यासाठी घड्याळाशिवाय एखाद्या वेगळ्या चिन्हाचा विचार का करत नाही? असा प्रश्न करत वेगळं चिन्ह निवडण्याचा सल्ला दिलेला. आज यासंदर्भात अजित पवार गट काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून अवघ्या महिन्याभरामध्ये मतदान होणार असून चिन्हामध्ये बदल केल्यास अजित पवार गटाला फटका बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने तुतारी हे चिन्हं स्वीकारलं आहे.
आता अजित पवार गटालाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह बदलावं लागतं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षाचं चिन्ह घड्याळ हेच आहे. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला नवीन चिन्ह स्वीकारावं लागलं तर त्यांना ते मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी फारच मेहनत घ्यावी लागणार आहे. अजित पवार गटाला वेगळं चिन्ह वापरावं लागलं तर एक प्रकारे अजित पवार गटाची ओळखच पुसली जाणार असल्याची चर्चा आहे.
निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात 19 फेब्रुवारीला सुनावणी पार पडली. यामध्ये निवडणूक आयोगाला शरद पवार यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना 7 दिवसांमध्ये पक्ष चिन्ह देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर शरद पवार गटाला 22 फेब्रुवारीला निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने दोन गटात वाद झाल्यानंतर अजित पवार गटाला 6 फेब्रुवारीला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. या संदर्भात पुढील सुनावणी आज म्हणजेच 19 मार्चला होणार आहे.