Ncp Mlas Disqualification Case: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीसाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली असून 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले होते. शरद पवार गट विरोधी बाकावर आहेत तर, अजित पवार गटातील आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. थोडक्यात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षाचेही प्रकरण आहे. कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आता या प्रकरणी 15 फेब्रुवारीला निकाल देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.
शिवसेनासंबंधी पक्ष आणि चिन्हासंबंधी निवडणूक आयोगाचा निर्णय झाला होता. त्यामुळं या आधारावर राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीदेखील येत्या काही दिवसांत निवडणूक आयोग निर्णय देऊ शकते. त्यामुळं जरी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळ वाढवून दिला असला तरी तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेऊन राहुल नार्वेकर निर्णय घेऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंबंधी निवडणूक आयोगाने 8 डिसेंबरला निर्णय राखीव ठेवला होता. आयोग कधीही हा निर्णय देऊ शकते. कदाचित तो आज किंवा उद्यापर्यंतही येऊ शकतो. त्याचा आधार नार्वेकर वापरु शकतील. त्यानुसार त्यांना निकालाचे जजमेंट 15 फेब्रुवारीला द्यावेच लागेल, अशी माहिती वकिलांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात नार्वेकरांच्या वकिलांनी अशी हमी दिली आहे की निकाल 31 जानेवारीला पूर्ण होईल. पण तो निकाल डिक्टेट करायला दोन आठवड्यांचा कालावधी लागेल. त्यामुळं 15 तारखेला राष्ट्रवादीचा निर्णय नक्कीच येईल, असा दावा वकिलांनी केला आहे.