Navneet Rana Caste Certificate Case: अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या नवनीत राणांना आज निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने नवीन राणांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश सुप्रिम कोर्टाने रद्द केला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती के. के. महारेश्वरी, न्यायमूर्ती संजय करोल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे.
नवनीत कौर आणि रवी राणा यांचा विवाह 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात 2017 मध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवले होते. विशेष म्हणजे याच प्रमाणपत्राच्या आधारे नवनीत राणा-कौर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. या निवडणूकीत नवनीत राणा यांनी विजय मिळवत आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला.
नवनवीत राणा यांनी जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणांचे वडील हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला.
नवनीत राणा आज अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. अमरावतीमध्ये यानिमित्त मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीसही सहभागी झाले आहेत. ही रॅली सुरु असतानाच सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. या निकालाचा संदर्भ फडणवीस यांनी दिला. नवनीत राणा यांच्यावर जे लोक जात प्रमाणपत्रावरुन आरोप करत होते त्यांना आज कोर्टाने उत्तर दिलं आहे, असं फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. मागील काही दिवसांपासून अमरावतीमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. बच्चू कडू यांनीही आपल्या भाषणामध्ये नवनीत राणांवर या विषयावरुन टीका केली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांना दिलासा दिल्याने त्या निवडणुकीचा अर्ज भरु शकणार आहेत. 4 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज भरण्याची मूदत आहे.