मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पुजा मोरेंना पोलिसांकडून धक्काबुक्की

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते.

Updated: Sep 12, 2019, 03:47 PM IST
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पुजा मोरेंना पोलिसांकडून धक्काबुक्की  title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना: महाजनादेश यात्रेदरम्यान जालन्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पूजा मोरेंना पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्कीची राज्य महिला आयोगाकडून स्वाधिकारे दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईचे राज्य महिला आयोगाकडून पोलीस अधीक्षकांना आदेश मिळाले आहेत.

28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी हे झेंडे दाखवले होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान पूजा मोरे यांना ताब्यात घेताना त्यांना पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले,या व्हिडिओचा दाखला देत या धक्काबुक्कीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांना दिले आहेत.

पूजा मोरे यांना निवेदन देत असताना पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी धक्काबुक्की करणं ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याचं आयोगाने म्हटलं आहे.तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे पाठवावा असे निर्देश देखील महिला आयोगाने जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

समाजमाध्यमांवर पूजा मोरे यांच्या प्रतिक्रियेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता यामध्ये मोरे यांनी पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार नसताना देखील त्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.