नवी दिल्ली: नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशपातळीवर विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना पुन्हा वेग आला आहे. या पाच राज्यांपैकी मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली. या तिन्ही राज्यांमध्ये रविवारी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रातील शेतकरी नेते खासदार राजू शेट्ठी यांना खास निमंत्रण दिले आहे. राजस्थानचे नियोजित मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी खा.शेट्टी यांना स्वतः फोन केला होता. राजू शेट्टी यांनीही हे निमंत्रण स्वीकारले असून ते उद्या शपथविधी सोहळ्याला जाणार आहेत. त्यासाठी खास विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांमधील प्रचारादरम्यान काँग्रेसने शेतकऱ्यांचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. तसेच काँग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासनही दिले होते. मतदारांनी या मुद्द्याला चांगला प्रतिसाद देत काँग्रेसच्या हातात सत्ता दिली. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना खास निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनात राजू शेट्टी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यामुळे झालेल्या वातावरणनिर्मितीचा फायदा काँग्रेसला काही प्रमाणात मिळाला होता.
दरम्यान, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत तर मध्य प्रदेशात कमलनाथ हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. मात्र, छत्तीसगढमध्ये अजूनही मुख्यमंत्री कोण असणार, हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगढमधील चार नेत्यांसोबतचा फोटो ट्विट केल्यामुळे या उत्सुकतेत आणखीनच भर पडली आहे. रायपूरमध्ये रविवारी दुपारी १२ वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी दिली.