भंडारा : भंडा-यातल्या सिरसी गावात राहणारे संजय कहालकर व्यवसायानं टेलर आहेत. कपडे शिवत असताना सातत्यानं त्यांना तोंडात सुई ठेवण्याची सवय होती. मात्र याच सवयीनं त्यांचा घात केला.
आठ दिवसांपूर्वी अशीच सुई तोंडात ठेवली असता नकळत ती त्यांच्या पोटात गेली. मात्र त्याची साधी कल्पनाही संजय यांना नव्हती. पण काही दिवसांतच त्यांना फुफ्फुसात दुखणं, खोकल्याचा त्रास सुरू झाला.
डॉक्टरांनी त्यांचा एक्स रे काढला असता त्यांच्या फुफ्फुसात ५ सेंटीमीटरची सुई आढळून आली. मात्र आर्थिक स्थिती बेताचीच असल्यानं एवढी महागडी शस्त्रक्रिया त्यांना परवडणारी नव्हती. डॉक्टर आशिष उजवणेंनी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना फुफ्फुसात अडकलेली सुई यशस्वीपणे काढण्यात यश आलं.
एवढी अवघड शस्त्रक्रिया छोट्या गावातही पार पडू शकते हेच या शस्त्रक्रियेद्वारे स्पष्ट झालं. कहालकरांवरील शस्त्रक्रिया जरी यशस्वी झाली असली तरी नेहमीच हे शक्य होईल असं नाही. त्यामुळेच अशा सवयींना जरा दूरच ठेवा.