सांगली : माणसाप्रमाणं बोलणारा पोपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण माणसाला हाक मारणारा कोंबडा कधी पाहिलाय का..? सांगलीत चक्क असा एक कोंबडा आहे, तो बोलतो. विश्वास बसत नाही ना? पण ते सत्य आहे.
लाल तुऱ्याचा आणि ऐटबाज चालीचा कोंबडा. सांगली जिल्ह्यातल्या आळसंद गावात राहणारे लक्ष्मण मोहिते यांनी पाळलेला हा कोंबडा. गावातले सगळे लोक लक्ष्मण आजोबांना अण्णा अशा टोपणनावानं हाक मारतात. साधारण पंधरा दिवसांपूर्वी लक्ष्मण मोहितेंची बायको हौसाबाई हिनं या पाळलेल्या कोंबड्याला पकडलं.
तेव्हा हा कोंबडा चक्क 'अण्णा अण्णा' अशी हाक मारू लागला. आपल्या मालकाला अण्णा नावानं हाक मारणारा हा पाळीव कोंबडा सध्या सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय झालाय. आळसंद गावातच नव्हे, तर अवघ्या पंचक्रोशीत या कोंबड्यानं सगळ्यांनाच लळा लावलाय. हा बोलका कोंबडा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होतेय. सूर्य उजाडण्याआधी रोज सकाळी बांग देणारा कोंबडा सध्या अण्णा अण्णा बोलतोय. उद्या तो मालकाची भाषा बोलायला लागला, तर....