कोल्हापूर : राज्य सरकारच्या शिक्षणाचं खासगीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात विद्यार्थी आणि पालकांनी शाहू मार्केट यार्डसमोर रास्ता रोको करून आंदोलन केलं. यावेळी रस्त्यावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील 1300 शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हयातील 34 शाळांचा समावेश आहे. कोल्हापूर शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीनं पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यसरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सरकारच्या शिक्षण धोरणाच्या विरोधात घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. शासनाचा हा विचार दुर्दैवी असून या निर्णयामुळे सर्वसामान्य वर्गातील मुलांना शिक्षण मिळेल की, नाही अशी चिंता विध्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलीय.