दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...'

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 15, 2023, 04:03 PM IST
दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'जेलमध्ये आम्ही...' title=

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे? तसंच बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली आहे. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आपले सलीम कुत्ताशी काही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच तपासात सहकार्य करु असं म्हटलं आहे. 

सुधाकर बडगुजर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजला जाणारा सलीम कुत्ता एकत्र पार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पक्षाकडून यांना संरक्षण कसं दिलं जातं, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

 

त्यावर स्पष्टीकरण देताना सुधाकर बडगुजर यांनी सांगितलं आहे की, "नितेश राणेंनी योग्य माहिती घेतली नसावी. 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणी वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी सभा झाली. त्या सभेच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. त्यानंतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 14 ते 15 दिवस मीदेखील जेलमध्ये होतो. यादरम्यान बॉम्बस्फोटाचे आरोपीही जेलमध्ये होते. आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नव्हती. नाशिक सेंट्रेल जेलमध्ये आम्ही फक्त कैदी म्हणून एकत्र होतो". 

ठाकरे गटाच्या नेत्याची दाऊदच्या हस्तकाबरोबर पार्टी, नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले फोटो

"माझ्यावर राजकारणात येण्याआधी एकही गुन्हा दाखल नव्हता. ज्या काही केसेस दाखल आहे त्या राजकारणात आल्यानंतर राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सलीम कुत्ताला 92-93 मध्ये अटक झाली असेल. 2016 मध्ये मला अटक झाली. माझे ना कधी त्याच्याशी संबंध होते आणि यापुढेही नसतील," असं बडगुजर म्हणाले आहेत. दरम्यान हा वेबनाव असून, मॉर्फिग केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा? तो पेरोलवर आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सहभागी होऊ शकतो. तिथे भेट झाली असेल तर माहिती नाही अशीही शक्यता त्यांनी बोलून दाखवली.  राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात. बुद्धिबळाचा खेळ सुरु असतो. त्याबद्दल फार काही बोलण्यात अर्थ नाही. पोलिसांना चौकशीत माझं सहकार्य असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. 
 
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात अनेक आमदार, मंत्री गेले होते. ती क्लिपही सोशल मीडियावर आहे. प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांचा तर करार आहे. त्यांचं काय झालं? अशी विचारणा बडगुजर यांनी केली आहे.