सीडीआर विक्रीप्रकरणी मुख्य आरोपी सौरव साहुला दिल्लीतून अटक

..

Updated: Jun 19, 2018, 02:01 PM IST

ठाणे: सीडीआर विक्रीप्रकरणातील मुख्य आरोपी सौरव साहु याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने दिल्लीतून रविवारी सायंकाळी अटक केली. याप्रकरणात सहा महिन्यांपुर्वी नाव पुढे आल्यानंतर ठाणे पोलिसांची पथके त्याच्या मागावर होती. मात्र, तेव्हापासून तो पोलिसांच्या पथकाला गुंगारा देत होता. अखेर त्याला दिल्लीमधील घरातून अटक करण्यात पथकाला यश आले.

सीडीआरप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक

या प्रकरणात खासगी गुप्तहेरांसह, पोलिस कर्मचारी आणि वकील अशा एकूण १५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यातील अनेक आरोपींना सौरव साहु याने बेकायदा सिडीआर मिळवून दिल्याची बाब तपासात पुढे आली होती. तसेच याप्रकरणात सौरव हा मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे पोलिसांची पथके त्याचा दिल्लीत शोध घेत होती. मात्र, तो पथकाला गुंगारा देत होता.

दिल्लीतील घरातून अटक

रविवारी सायंकाळी सौरव हा दिल्लीतील घरी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या पथकाने दिल्लीत जाऊन त्याला घरातून अटक केली. त्याला बेकायदा सिडीआरप्रकरणात २०१६ मध्ये दिल्ली पोलिसांनी तर २०१७ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा बेकायदा सिडीआरप्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.