मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकाने शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. याने मुंबई आणि ठाण्यात कुणाला शस्त्र विकली हे तपासात उघड होणार आहे. 

Updated: Jul 12, 2023, 06:48 PM IST
मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केलीत? क्राईम ब्रांचच्या हाती लागला शस्त्र विकणाऱ्या गँंगचा म्होरक्या title=

Thane Crime News : मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच  गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असतानाच ठाणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मुंबई, ठाण्यात अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या गँगच्या म्होरक्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून मोठा शस्त्रसाठाही पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपीच्या तपासात  मुंबई, ठाण्यात कोणी आणि का पिस्तुल खरेदी केली आहेत. याचा देखील खुलासा होणार आहे. 

थेट धुळ्यातून आरोपीला अटक

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या पथकाने थेट धुळे जिल्ह्यातील पलासनेरला जात अवैधरित्या शस्त्र निर्मिती करून विकणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. मागील काही महिन्यांपासून ठाणे आणि परिसरात अवैधरीत्या बंदुका आणि शस्त्र विक्रीचा व्यवसाय तेजीत आला होता. त्याला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसानी काही महिन्यांपूर्वी केलेल्या कॉम्बिग ऑपरेशन मध्ये एका टोळीचा फर्दाफाश करत तीन जणांना अटक केली होती. मात्र, या टोळीचा म्होरक्या फरार झाला होता. तेव्हापासूनच ठाणे पोलीस त्याच्या मागावर आसतांना धुळे जिल्ह्यातील पलासनेर येथे तो येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार ठाणे पोलिसांच्या पथकाने धुळे येथे जात या गॅंग चा म्होरक्या असणाऱ्या सुजितसिंग उर्फ माजा आवसिंग याला अटक केली आहे.

आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून 1 माशिनगन, 20 गावठी पिस्तुल आणि 280 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही पूर्ण टोळी ही महाराष्ट्रला लागून असणाऱ्या मध्य प्रदेशातील दुर्गम भागातील आहे. त्यांचा अवैध पणे शस्त्र निर्मिती करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. मध्य प्रदेशातील गावांत ही हॅन्ड मेड शस्त्रे आणि काडतुसे हे टोळी स्वतः बनवत आणि मुंबई, ठाणे परिसरात आणून विकत असे. या टोळीचा छडा लागल्याने आता कोण कोण या टोळीकडून अवैधरित्या शस्त्रे विकत घेत होते याचाही तपास आता पोलिसानी सुरू केला आहे.

संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केलाय?

मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चाललीय अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कारागृहातल्या अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय असा आरोप राऊतांनी केला आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष द्यावं असा सल्ला राऊतांनी दिला. तर राऊतांचे आरोप बेछुट आणि खोटे असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला आहे.