तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पत्नी व दोन मुलांची डोक्यात बॅट घालून हत्या

Thane Crime News Today: ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. ठाण्यातील कासारवडवली भागात पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 21, 2023, 04:27 PM IST
 तिहेरी हत्याकांडाने ठाणे हादरले, पत्नी व दोन मुलांची डोक्यात बॅट घालून हत्या title=
Thane Kasarwadwali Triple Murder Wife and Two children Killed with Bats on Heads by Husband latest Marathi News

Thane Crime News Today:  ठाण्यातील कासारवडवली भागात तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दारू पिणाऱ्या पतीसोबत वारंवार भांडणे होत असल्याने पत्नी घर सोडून गेल्याने आरोपीने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. हत्येच्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीचे नाव अमित धर्मवारी बागडी असे असून तो काहीच व्यवसाय करत नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याप्रकरणात एक महिला व लहान मुलगा व मुलगी यांचा मृतदेह सापडला आहे. महिलेचे नाव भावना अमित  बागडी, खुशी अमित बागडी (६ वर्ष) आणि मुलाचे नाव अकुंश अमित बागडी (8 वर्षे) असे आहेत. आरोपीने सततच्या भांडणातून त्यांच्या पत्नीची व दोन मुलींची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीची पत्नी व मुलं त्याच्या सख्ख्या भावाकडे राहत होती. तर, आरोपीदेखील गेल्या तीन दिवसांपासून त्याच्याकडे राहायला आला होता. तेव्हाच त्याने तिघांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. 

आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. या त्रासाला वैतागून त्याची पत्नी मुलांना घेऊन त्याच्या सख्या लहान भावाकडे राहत होती. गेल्या तीन दिवसांपासून आरोपी भावना व दोन मुलांना भेटण्यासाठी म्हणून भावाच्या घरी आला होता व त्यांच्यासोबत राहत होता. आज सकाळच्या सुमारास आरोपीचा भाऊ नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकिपिंगच्या कामासाठी गेला होता. त्यानंतर जवळपास अकराच्या सुमारास घरी परतला. तेव्हा घरात भावना व दोन मुले मृतावस्थेत आढळून आले. 

भावना व दोन्ही मुलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांचा पायाखालची जमिनच हादरली. त्यांच्या मृतदेहाजवळ क्रिकेटची लाकडी बॅटदेखील आढळून आली. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. तसंच. प्राथमिक स्वरुपाची माहिती गोळा करुन पुढील तपासास सुरुवात केली आहे.