ठाणे : सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात (Thane) एका विवाहितेनं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या महिलेने स्वत:चा व्हिडिओ रेकॉर्ड (Video Record) केला आणि आपल्या मैत्रिणींना पाठवला. ठाण्यातील वर्तकनगर (Thane Vartak Nagar) भागातली ही धक्कादायक घटना आहे.
व्हिडिओत या महिलेनं तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दलची सर्व माहिती रेकॉर्ड केली. रात्री 2 च्या सुमारास व्हिडिओ तयार करून तीने आपल्या खास मैत्रिणींना पाठवला आणि त्यानंतर आत्महत्या (Suicide Case) केली. या व्हिडिओमध्ये रडत रडत या महिलेनं आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली.
या व्हिडिओमध्ये तीने आई-वडिलांची माफी मागत आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. 'आता आणखी सहन होत नाही, पती दुर्लक्ष करतो, तो केवळ स्वत:चा विचार करतो, माझं न ऐकता केवळ माझ्याविरुद्ध भडकवत असतो, माझ्यासाठी त्यांच्याकडे कधीच वेळ नसतो, आजारी असताना डॉक्टरकडे न नेता मेलीस तरी चालेल, असं तो म्हणतो.
सासरचे खर्चासाठी एकही पैसा देत नाहीत, त्यामुळे थोडे थोडे पैसे जमवून शिलाई मशिन घेतली. पण सासूने त्यावरही बंदी आणली, तुला हे काम करण्याची काय गरज आहे, घरात कपडे मिळत नाहीत का, खायला मिळत नाही का? असं म्हणत शिलाई मशीनचं काम करण्यावर बंदी घातली. माझे पती सर्वांसमोर माझ्याशी इतकं चांगलं बोलतो, खूप महान असल्याचा आव आणतो. पण प्रत्यक्षात माझ्याबरोबर चांगला व्यवहार करत नाही, हे सर्व सहन होत नाही, त्यामुळे आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं या महिलेनं व्हिडिओमध्ये सांगितलं.
या महिलेच्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.