बिअरच्या ट्रकला अपघात, मदत करायची सोडून बिअरचे बॉक्स केले लंपास

फुकटची बिअर मिळवण्यासाठी गर्दी, अवघ्या तासाभरात बिअरचे 1800 बॉक्स लुटारूंनी लंपास केले 

Updated: Jul 26, 2021, 09:06 PM IST
बिअरच्या ट्रकला अपघात, मदत करायची सोडून बिअरचे बॉक्स केले लंपास

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद-मुंबई रस्त्यावर बिअरच्या बाटल्यांनी भरलेल्या एका कंटेनरला अपघात झाला. वैजापूर तालुक्यातील करंजगावातल्या वळणावर हॉटेल ब्ल्यू मूनजवळ बिअरच्या बाटल्यांनी भरलेल्या हा कंटनेर पलटी झाला. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली. पण ही गर्दी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नाही तर कंटेनरमधल्या बिअरच्या बाटल्या पळवण्यासाठी होती. 

बीअरच्या बाटल्यांचा कंटेनर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली, आणि आजुबाजूच्या गावातल्या लोकांनीही बीअर बाटल्या लुटण्यासाठी तोबा गर्दी केली. काहींनी तर बॉक्सच्या बॉक्स पळवून नेले. बॉक्स पळवताना बाटल्या रस्त्यावर पडून फुटत होत्या, काचांचा सडा पडला होता, पण बिअर पळवणा-यांना त्याची काहीच फिकीर नव्हती. 

अपघातग्रस्त कंटनेरच्या चालकाने लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण लुटारूंपुढे त्याचेही प्रयत्न तोकडे पडले.अवघ्या तासाभरात बिअरचे 1800 बॉक्स लुटारूंनी लंपास केले. दरम्यान, बिअरची लुटालूट करणारे करंजगावातले नव्हते, तर आजुबाजूच्या गावातले होते, असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे..

महागाईमुळं दारूच्या किंमती आधीच वाढल्यात. त्यात लॉकडाऊनमुळं दारू मिळेनाशीही झालीय. त्यामुळं फुकटात मिळणारी बिअर पळवण्यासाठी तळीरामांनी एकच गर्दी केली होती.