औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका खाजगी रुग्णालयावर चार जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात रुग्णालयाच्या सामानाची नासधूस करण्यात आली आहे. सुदैवानं या तोडफोडीत कुणीही जखमी झाले नाही. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतलंय.
पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली त्यातून या तोडफोडीचं जे कारण समोर आलं ते ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. खासगी रुग्णालयात करण्यात आलेल्या या तोडफोडीमध्ये रुग्णालयाचं मोठं नुकसान झालं आहे.
तोडफोड करतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत चौघांना अटक केली आहे. मुलाला नोकरीवरुन कमी केल्याच्या रागातून वडिलांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.
रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने आपल्या मुलाला कामावरुन कमी केले. याचा मुलाच्या वडिलांना राग आला. या रागातूनच वडिलांनी आपल्या मित्रांना सोबत घेत त्या रुग्णालयात तुफान तोडफोड केली. परंतु, मुलाला नोकरीवरुन काढून का टाकण्यात आलं, याचे कारण मात्र अद्याप समजलेलं नाही.