१७ तासानंतर प्रवाशांची सुटका, प्रवाशांच्या जिवाशी रेल्वेचा खेळ

२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली.

Updated: Jul 27, 2019, 08:57 PM IST
१७ तासानंतर प्रवाशांची सुटका, प्रवाशांच्या जिवाशी रेल्वेचा खेळ title=

चंद्रशेखर भुयार, झी २४ तास, बदलापूर : २६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावरून वाहणाऱ्या पुरामुळे अडकली आणि तब्बल १७ तास प्रवाशांनी जीव मुठीत धरून यातना सहन केल्या. या घटनेने प्रशासनाची उदासिनता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा फोलपणा उघड झाला. या घटनेमध्ये रेल्वेच्या उदासिन कारभाराबरोबरच रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चारही बाजूने पुराच्या पाण्यात वेढलेली ही महालक्ष्मी एक्स्प्रेस. उल्हासनदीचे पाणी डब्यात कधीही शिरेल अशी स्थिती. आणि जीव मुठीत धरून बसलेले एक हजार पन्नास प्रवासी. प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही अशा अवस्थेत तब्बल १७ तास हे प्रवासी जीव मुठीत धरून बसले होते. खरं तर जेव्हा काल पाण्याने भरलेल्या रेल्वे स्थानकातून महालक्ष्मी एक्स्प्रेस पाणी उडवत गेली होती. तेव्हाच प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. 

गाडी पुढे फार तर चार किलोमीटर गेली असेल उल्हासनदीच्या पुराच्या पाण्यात गाडी अडकली. जेव्हा पाण्याने वेढलेला परिसर प्रवाशांनी पाहिला तेव्हा त्यांना सगळंकाही कळून चुकले होते. पुढचे काही तास प्रवाशांसाठी अक्षरक्षः मृत्यूशी सामना करावा लागला.

काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना फोन केला. पण पोलिसांनी रेल्वे आपल्या अख्यत्यारित नसल्याचे सांगून प्रवाशांना मदत नाकारत हात वर केले, अशी माहिती प्रवाशांनी दिली. सकाळ झाली तरी प्रशासन झोपलेलेच होते. जवळच्या चामटोली गावातील काही तरूणांनी जीव धोक्यात घालून प्रवाशांना मदतीचा पहिला हात दिला. नंतर एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल झाली. 
नेव्हीचे हेलिकॉप्टर आणि बोटींमधून प्रवाशांना काढायला सुरुवात झाली. प्रवाशांना जवळच्या टेकडीवर नेण्यात आलं. तिथून या प्रवाशांना बदलापूरला नेण्यात आलं. पुराचा वेढा असताना रेल्वेचा मोटरमन एक हजार प्रवाशांचा जीव धोक्यात कसा घालू शकतो? रेल्वेची आपत्कालिन यंत्रणा प्रतिसाद देण्यास एवढा वेळ का लावते असा सवाल विचारला जात आहे.