शासकीय योजनांचा गैर फायदा, बेरोजगारांची फसवणूक

सर्व सामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैर फायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली. 

Updated: Jun 28, 2017, 10:22 PM IST
 title=

अखिलेश हळवे, नागपूर : सर्व सामान्य जनतेचा शासकीय योजनांवरील विश्वासाचा गैर फायदा घेत बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष देत फसवणूक करणाऱ्या एका टोळीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने चक्क पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्याअंतर्गत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत युवकांची फसवणूक केली. 

शिक्षण संपल्यावर हे विद्यार्थी नोकरीच्या शोधात होते तेव्हा त्यांना एका स्थानिक वर्तमान पत्रात अशा प्रकारची जाहिरात दिसली. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण देत नोकरी देण्याचं आश्वासन या जाहिरातीत होते. शासकीय योजनेच्याअंतर्गत ही नोकरी मिळणार असल्याने या चौघांनी विश्वास ठेवत त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करायला सुरुवात केली.

आधी प्रशिक्षण आणि नंतर नोकरी देण्याचं आश्वासन या चौघांना देण्यात आलं. एवढंच नाही तर कुठल्या पदांसाठी त्यांना नोकरी हवी आहे आणि त्या पदाकरिता त्यांना किती पगार मिळेल हे देखील त्यांना एका कॉल सेंटरच्या माध्यमाने सांगण्यात आले. मागितलेल्या नोकरीप्रमाणे त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठीही सांगितले गेलं. पण पैसे जमा करून बरेच दिवस लोटल्यावरही काहीही झालं नाही आणि कॉल सेंटरच्या तरुणींचे फोन ही बंद झाले.  तेव्हा या चौघांना संशय आला आणि त्यांनी नागपूर पोलिसांच्या सायबर सेलमध्ये फसवणुकीची तक्रार केली. 

सरकारी नोकरीसारखंच सहीशिक्क्याचं ऑफर लेटरही या तरूणांना मिळालं. त्यामुळे त्यावर विश्वास बसणंही स्वाभाविकच होतं. पोलीस तपासात यातली धक्कादायक माहिती समोर येत गेली. चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाह इथे आरोपींनी अवैध कॉल सेंटर निर्माण केलं होतं. तिथे ११ तरुण तरुणींची नेमणूकही केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण कुमार वाल्मिकी प्रसाद आधी नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन नावाच्या शासकीय योजनेत सहभागी झाला होता. तिथे काम करतानाच सहकारी अरुण त्रिवेदीच्या मदतीने त्याने  गोरखधंदा सुरु केला. 

या टोळीने २,४०८ बेरोजगार युवकांशी संपर्क साधला असून यापैकी सुमारे ३०० युवकांकडून पैसे घेतल्याचं पोलिसांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे फसवणुकीकरिता या टोळीने राज्यातील ४२ जिल्ह्यातील बेरोजगारांशिवाय पर-राज्यातील अहमदाबाद, मीरठ आणि गोवा येथील तरुणांशी संपर्क साधला होता. या घटनांतून धडा घेत युवकांनी यापुढे शासकीय नोकरीकरिता प्रयत्न करताना सावध असावे, असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे.