खडसेंच्या ऑडिओ क्लिपमुळे जळगावमध्ये खळबळ

ऑडिओ क्लिपमधील आवाज हा एकनाथ खडसे यांच्या आवाजासारखाच असल्यामुळे ही क्लिप खडसे यांचीच असल्याची चर्चा आहे.

Annaso Chavare Updated: Jul 30, 2018, 11:32 AM IST
खडसेंच्या ऑडिओ क्लिपमुळे जळगावमध्ये खळबळ title=

जळगाव: राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यामागचे अडचणींचे शुक्लकाष्ट काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत सध्या एका ऑडिओ क्लिपनं खळबळ उडवून दिलीय. भाजपला मतदान करा असं आवाहन करणारी एक संदेशात्मक ऑडिओ क्लिप सध्या जळगावात व्हायरल झालीय. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा एकनाथ खडसे यांच्या आवाजासारखाच असल्यामुळे ही क्लिप खडसे यांचीच असल्याची चर्चा आहे.

खडसेंकडून वृत्ताचे खंडण

दरम्यान, आपण अशी कुठलीही क्लिप रेकॉर्ड केली नाही, असं खडसेंचं म्हणणं आहे. 'ही ऑडिओ क्लिप ऐकून आपल्याला धक्का बसला. भविष्यात अशाच ऑडिओ क्लिप्स बनवून फसविण्याचा प्रयत्न होईल', अशी भीती खडसेंनी व्यक्त केलीय. या क्लिपसंदर्भात एकनाथ खडसेंनी पोलिसांकडे तक्रारही केलीय.

जळगाव महापालिका प्रचार अंतिम टप्प्यात

दरम्यान,  जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांना जोर चढलाय.  शिवसेना नुकताच वाघ असल्याचा आव आणतेय, मात्र विधानसभेसह राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची काय परिस्थिती आहे, असा सवाल राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. जळगाव महापालिकेसाठी बुधवारी मतदान होतंय. गिरीश महाजन यांची जळगावातल्या सुभाष चौकात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शेलक्या भाषेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. या निवडणुकीत शिवसेना भाजप आमनेसामने आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीत काही जागा अपवाद वगळता मैत्रीपूर्ण लढती होतायत.