अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर पोलिसांनी आंतरराज्यीय चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरी करण्याकरता हा चोरटा ओडिशा इथून नागपूरमध्ये यायया आणि विविध भागात घरफोडी करायचा. त्याने शहरात एक दोन नव्हे तब्बल 16 चोऱ्या केल्याचं तपासात उघडकीस आली आहे.
प्रशांतकुमार कराड असं या चोरट्याचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 971 ग्रॅम सोने जप्त केलंय. त्यानं केवळ नागपुरातच नव्हे तर छत्तीसगड,ओडिशा आणि तामिळनाडूतही घरफोडी केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्याच्या साथीदार श्रीकांत सेठी यालाही पोलिसांनी अटक केलली आहे.
चोरट्या प्रशांत कराड हा ओडिशामधील गंजाम इथरा रहिवासी आहे. मौजमजेसाठी प्रशांत विविध शहरात जाऊन घरफोडी करायचा. नागपुरात फेब्रुवारी महिन्यापासून शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या परिसरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. बेलतरोडी, प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांनी तपासास सुरुवात केली.
पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये चोरीच्या विविध घटनांमध्ये एकच व्यक्ती सातत्याने दिसला. चोरीच्या ठिकाणी त्याच्या हाताचे आणि पायाचे ठसेही पोलिसांना आढळून आले. दरम्यान, 21 मे रोजी मध्यरात्री प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात चोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावेळी पोलिसांनी परिसरात कोबिंग ऑपरेशन करीत शिताफीने त्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने रायपूरला श्रीकांत सेठी याला विकण्यासाठी देत असल्याचंही सांगितलं. त्यानुसार सात दिवसांचे ऑपरेशन राबवून पोलिसांनी श्रीकांत सेठी याला भुवनेश्वर इथल्या एका गावातून अटक केली.
त्याने तिथे दोन सोनारांकडे विकलेला तब्बल 38 लाख 12 हजारांचा मुद्देमालही जप्त केला. आरोपी प्रशांतकुमार कराड हा ओडिशातील हिस्ट्रीशिटर असल्याचं पोलिसांनी सांगितलं.