तुषार तपासे झी मीडिया सातारा : साताऱ्यात ATM चोरीचा एक खतरनाक प्लान उघडकीस आला आहे. साताऱ्याच्या कराड-ओगलेवाडी मार्गावरील गजानन सोसायटीत थरार घडलाय. इथं बँक ऑफ इंडियाचं ATM आहे. हे ATM लांबवण्यासाठी चोरट्यांनी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा वापर केलाय.
पहाटे तीनच्या सुमारास अख्खं ATM लांबवण्यासाठी चोरटे इथं आले. मात्र पोलीस आणि चोरट्यांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून तीन चोरट्यांनी तिथून पळ काढला. मात्र एकाला पकडण्यात यश आलं. या चोरट्यांनी ATMमध्ये जिलेटीनच्या कांड्या चिटकवल्या होत्या. या कांड्या काढता येत नसल्यानं अखेर जिलेटीनचा स्फोट करून त्या निकामी करण्यात आल्या.
एखादा दहशतवादी हल्ला व्हावा असाच थरार कराडमधल्या नागरिकांनी अनुभवला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची मोठी घटना टळलीय. मात्र ATMवर डल्ला मारण्यासाठी चोरट्यांची मजल आता थेट स्फोट घडवण्यापर्यंत गेलीय हेच यातून स्पष्ट होतंय. कराडकरांचं नशीब बलवत्तर म्हणून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता या घटनेतून सर्वच ठिकाणच्या पोलिसांनी आणि नागरिकांनी धडा घेणं गरजेचं आहे.