मुंबईत अनलॉक नाहीच, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का?

राज्यातील 25 जिल्ह्यांत काही नियम शिथिल करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आता लोकल सुरु कधी होणार यावर लागले आहे.

Updated: Aug 2, 2021, 09:30 PM IST
मुंबईत अनलॉक नाहीच, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का? title=

मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईकरांची आणि लगतच्या जिल्ह्यांची लाईफलाईन आहे. परंतु कोरोनामुळे सर्वसामांन्यासाठी रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहे. आधीच कोरोनाने अनेक लोकांचे जॉब्स गेले आहेत, त्यात लोकल सुरु नसल्याने लोकांना लांबून प्रवास करने देखील शक्य होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे लक्ष हे लोकं कधी सुरू होणार आहे याकडे लागून राहिले आहे.

महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्ह्यांत काही नियम शिथिल करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आता लोकल सुरु कधी होणार यावर लागले आहे. लोकांच्या मते दोन लस घेणाऱ्यांसाठी तरी लोकल सुरू करण्यात यावी. यामुळे काही प्रमाणात का होईना लोकांना दिलासा मिळेल. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय राज्य सरकारकडून देण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, त्यामुळे लोकलचा निर्णय एवढ्यात घेता येणार नाही.

तसे पाहाता आज रात्री मुंबई महापालिकेची बैठक होणार आहे आणि कदाचित त्या बैठकीत लोकलबाबत काही निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु या बैठकीतून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता तशी फारच कमी असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवीन नियमावली काय?

मुख्यमंत्र्यांनी आज 2 ऑगस्टला कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे त्यात राज्यातील 11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार म्हणजे आठवड्यातले 5 दिवस दुकानं रात्री ८ पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे, तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत आणि रविवारी दुकानं पूर्ण बंद राहणार असल्याचा निर्णय देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या नियमावलीनुसार वेळेत वाढ करुन दिली आहे. व्यावसायासाठी वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून अनेकदा करण्यात आली होती. ही मागणी आता मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.