नागपुरात टोमॅटो तब्बल 200 रुपये किलो; देशातील सर्वाधिक दर, भाज्यांचे दरही कडाडले

Tomato Price: टोमॅटो (Tomato) सध्या महागला असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून आणि खरेदीतून तो तात्पुरता गायब झाला आहे. त्यातच आता टोमॅटोच्या दराने नागपुरात (Nagpur) देशातील सर्वोच्च दर गाठला आहे. नागपुरात टोमॅटो 200 रुपये किलोने मिळत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jul 16, 2023, 11:17 AM IST
नागपुरात टोमॅटो तब्बल 200 रुपये किलो; देशातील सर्वाधिक दर, भाज्यांचे दरही कडाडले title=

Tomato Price: टोमॅटो (Tomato) सध्या महागला असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून तात्पुरता गायब झाला आहे. त्यातच आता टोमॅटोच्या दराने नागपुरात (Nagpur) देशातील सर्वोच्च दर गाठला आहे. नागपुरात टोमॅटो 200 रुपये किलोने मिळत आहेत. दरम्यान, दुसरीकडे भाज्यांचे दर गडाडले आहेत. भाज्यांची आवक होणाऱ्या ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे हे दर वाढले आहेत.

नागपुरात पुन्हा एकदा भाज्यांचे दर कडाडले आहेत. मागील काही दिवसांपासून भाज्यांची आवक होणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. यामुळेच नागपूरच्या भाजी बाजारात भाज्यांचे दर हे शंभरीच्या पार पोहोचले आहे. तर टोमॅटोचा दर 200 च्या घरात गेला आहे. टोमॅटोचे दर काही दिवसांपूर्वी कमी झाले होते. पण आज पुन्हा भाज्यांचे टोमॅटोचे दर वाढले आहेत. 

यामध्ये कोथिंबीर 120 तर कोबीचा दर 160 च्या घरात पोहोचला आहे. तर टोमॅटो 150 वरून वरुन पुन्हा एकदा 200 रुपये किलो झाले आहेत. परसबी तर 320 रुपये किलोने बाजारात विकली जात आहे.. पुढील काही दिवस भाज्यांची आवक वाढत नाही तोपर्यंत भाज्यंचे दर असेच राहतील असं सांगितलं जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडत आहे.

राज्यात टोमॅटोचं पीक घेणारे शेतकरी जून महिन्यात लागवड सुरु करतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटो पट्ट्यात लागवडीला सुरुवात होते. त्यानंतर जवळपास 70 दिवसांनी पीक काढण्यास सुरुवात होते. दरम्यान हे टोमॅटो ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर आवाक्यात येण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

पुण्यातील नारायणगाव, जुन्नर, सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर व नागपूर जिल्ह्यांमध्ये टोमॅटोची लागवड होते. सुमारे 16 ते 57 हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली येतं. राज्यात वर्षाला सर्वसाधारण 10 लाख टन टोमॅटो उत्पादन घेतलं जातं. 

दरम्यान सध्या जरी टोमॅटोला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत असला तरी अनेकदा शेतकऱ्यांना हे पीक रस्त्यावर फेकून द्यावं लागलं होतं. डिसेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान टोमॅटोला अत्यंत कमी दर मिळाला होता. दर नसल्याने आणि मागणीही कमी असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला होता. मे महिन्यात हे टोमॅटो रस्त्यावर फेकल्यानंतर पिकाच्या नवीन लागवडीवर परिणाम झाला होता.