मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची आवक घटल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात टोमॅटोचे दर साधारण 60 ते 70 रुपये किलो होते. आज पुणे, मुंबईतील घाऊक तसेच किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 ते 100 रुपये किलो इतके झाले आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या पुरवठ्यात वाढ न झाल्यास टोमॅटोचे दर 100 रुपये प्रति किलोच्या पार जाण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यामुळे टोमॅटो लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. सध्या लग्नसराईचा सिजन सुरू आहे. तसेच उन्हामुळे टोमॅटोला चांगली मागणी असते. परंतू बाजारात पुरेसा पुरवठा नसल्याने टोमॅटोच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दोन वर्षापूर्वी टोमॅटोची लागवड कमी झाल्याने टोमॅटोचे दर शंभरी पर्यंत पोहचले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली तर, टोमॅटोचे दर अगदीच 5 ते 7 रुपये किलोवर आले. लागवडीचा खर्चही निघत नसल्याने हैराण शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले होते. काही शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर ट्रॅक्टर फिरवले होते.