मुंबई : राज्यात महामार्ग आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ मोठे खड्डेच खड्डे दिसत आहेत. या खड्यांनी अनेकांचा जीवही घेतला आहे तर काहींना जायबंदी केले आहे. खड्यांमुळे रस्ता अपघाताला निमंत्रणही मिळत आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी लोक याकडे डोळे झाक करताना दिसत आहेत. मुंबईशहर उपनगरात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहेत. मात्र, त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा खड्डे भरण्याकडे प्रशासनाचा भर दिसून येत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणी वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच १५ मिनिटांच्या प्रवासासाठी एक ते दीडतास लागत आहे. त्यातच वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे.
रस्त्यांवर पडलेले खड्डे सध्या मुंबईकरांची डोकेदुखी ठरत आहेत. त्यात प्रशासनाकडून कुठलीच पावले, हे खड्डे बुजविण्यासाठी उचलली जात नसल्यामुळे याचा ताण आता वाहतुकीवर देखील पडत आहे. ऐरोलीहुन पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. ज्यामुळे वाहतुकीच्या दोन लेन या बंद करून उरलेल्या तीन लहानवरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे ऐरोली आणि भांडुपच्या दिशेने वाहतुकीची कोंडी दिसून येते.
वाहतूक पोलिसांना ही वाहतूक कोंडी सोडवताना नाकी नऊ येतात. या रस्त्याची डागडुजी करण्याची जबाबदारी ही एमईपी टोल प्रशासनाची आहे. या संदर्भात टोल प्रशासनाशी विचारणा केली असता, पावसामुळे एक खड्डे बुजवून देखील पुन्हा रस्त्यांवर खड्डे पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुन्हा हे खड्डे बुजविले जातील, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच कल्याण-डोंबिवली येथेही रस्त्यांची अवस्था दयनिय झाली आहे.
दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावरही अशीच अवस्था आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, या कामाला गती मिळालेली नाही. कासवगतीने काम सुरु असल्याचे याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. खड्य्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या मार्गावरुन प्रवास करताना खड्यांमुळे जास्तीचा वेळ लागत आहे. मोठ मोठ्या खड्यांमुळे गाड्यांचेही नुकसान होत आहे. रस्ता टॅक्स भरुनही अशी अवस्था असेल तर कर कशासाठी भरायचा, असा सवाल वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.