शिर्डी : शिर्डीत सेवेत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी संजय शिंदे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांच्या वृद्ध आईवर आपल्या मुलाला शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
आपला तपास सुरू असल्याचं उत्तर शिर्डी पोलिसाकंडून संजय शिंदेंच्या आईला सतत दिलं जात आहे. गेल्या २० डिसेंबरला संजय शिंदे ड्यूटीवर चाललो म्हणून घरातून निघाले, ते कधी परतलेच नाहीत.
संजय यांच्या आईनं त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्यांचा संजय शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे २४ डिसेंबरला पोलीस ठाण्यातूनच संजयला ड्युटीवर पाठवा, असा निरोप आल्यानंतर संजय शिंदे बेपत्ता असल्याचा उलगडा त्यांच्या आईला झाला.