प्रशांत परदेशी / योगेश खरे, झी मीडिया, धुळे : अत्यंत करारी शेतकरी अशी धर्मा पाटलांची ओळख होती... आयुष्यभर शेतीवर प्रेम करणाऱ्या या माणसाचा शेवटही शेतीसाठी संघर्ष करता करताच झाला. त्यामुळे अख्खं विखरण हळहळलंय.
काटक, स्वाभिमानी, करारी आवाज असलेला आणि शेतीवर निरातिशय प्रेम असणारा शेतकरी अशी धर्मा पाटील यांची पंचक्रोशीत ओळख होती... धर्मा पाटलांना तीन मुली आणि दोन मुलगे... तेरा नातवंडं... शेतीच्या जोरावरच धर्मा पाटलांचा सुखी संसार सुरू होता.
मुलांची लग्नं केली... आपण बरं आपली शेती बरी... पाच एकर जमिनीत आंब्याच्या सहाशे झाडांची प्रेमानं मशागत सुरू होती... शेतीतून कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आणि गावात चांगुलपणा पेरायचा, असा धर्मा पाटलांचा कारभार होता.
धर्मा पाटलांचं सगळं काही उत्तम चाललं होतं, पण त्यांची जमीन औष्णिक वीजप्रकल्पासाठी अधिग्रहीत झाली, आणि पुढे सगळं काही बिनसतच गेलं.
राज्यातल्या कित्येक शेतकऱ्यांची व्यथा धर्मा पाटलांच्या निमित्तानं समोर आली. यंत्रणा खडबडून जागी झाली. आयुष्यभर शेतीवर प्रेम करणारे धर्मा पाटील जाताजाता हजारो शेतकऱ्यांसाठी संघर्षाची नवी मशाल पेटवून गेला.