अहमदनगर/
दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या अहमदनगरच्या दोघांना कोरोना झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे.
अहमदनगरमधील ३४ जणांनी निजामुद्दीनच्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्या सर्वांचे सँम्पल कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. उर्वरित १० जणांचे रिपोर्ट अजूनही आलेले नाहीत.
ज्या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांचे सँम्पल्स आता तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तर उर्वरित २२ जणांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ज्या १० जणांचे रिपोर्ट अजूनही आलेले नाहीत, त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे या ३४ जण आणखी किमान १०० जणांच्या संपर्कात आले असावेत असा संशय आहे.
रत्नागिरी/
दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात रत्नागिरीचे ८ ते १० जण असण्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाला कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानं रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचे सँम्पल आता तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. रत्नागिरीतून दिल्लीत निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ५ जणांची माहिती मिळाली असून अन्य तीन जण उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य दोघांचा पोलीस आणि प्रशासन शोध घेत आहे.
रत्नागिरीच्या रुग्णालयात दाखल केलेली व्यक्ती आधी ऑस्ट्रेलियात सिडनी इथं जाऊन आली आणि त्यानंतर दिल्लीत निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं कळतं. त्यामुळे रत्नागिरीतून दिल्लीत गेलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.