महिन्याभरात लग्न आहे, अक्षता टाका, संपल्या म्हणू नका; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य

उदयनराजेंकडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत

Updated: Jan 22, 2019, 08:16 AM IST
महिन्याभरात लग्न आहे, अक्षता टाका, संपल्या म्हणू नका; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य title=

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. ते सोमवारी पाटण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यावेळी उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. तेव्हा उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहत म्हटले की, महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका. उदयनराजेंच्या या सूचक वाक्यानंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने उदयनराजे यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे.

उदयनराजे चुकून शरद पवारांच्या गाडीत बसले आणि मग...

या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरुन कौतुक केले. महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेण्याचे धाडस सत्तेत असताना दाखवले आहे तसे कोणीही दाखवले नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले.

पवारांनी फसवा-फसवी केली तर बघून घेऊ - उदयनराजे भोसले

उदयनराजे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी शरद पवार वगळता पक्षातील अन्य नेत्यांशी त्यांचा संवाद नाही. त्यातही सातारा जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसलेंपासून ते रामराजे नाईक निंबाळकरांपर्यंत सर्व नेत्यांशी त्यांचा उभा वाद आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे कुणाकडून लढणार याची चर्चा सुरुच आहे. सिक्कीमच्या राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर माजी खासदार श्रीनिवास पाटील आता राजकारणात पुन्हा सक्रीय झालेत. उदयनराजेंची भाजपशी वाढती जवळीक पाहता शरद पवार साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचे समजते.