Uddhav Thackeray : पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नांदेडमध्ये पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक देखील काढण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही हकालपट्टी करण्यात आल्याचे यामध्ये म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंद बोढारकर, नांदेड उत्तर तालुकाप्रमुख जयंतराव कदम, धर्माबाद तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कपाटे, भोकर तालुकाप्रमुख अमोल पवार, नांदेड शहरप्रमुख तुलजेश यादव यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाया पाहता पदाधिकाऱ्यांना हटवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी एक दिवसीय नांदेड दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.