उदयनराजे भोसले शिवसेनेच्याही संपर्कात?

सध्याच्या राजकारणाचा एकूणच अनिश्चित बाज पाहता उदयनराजे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यताही नाकारता येणार नाही. 

Updated: Sep 1, 2019, 11:15 AM IST
उदयनराजे भोसले शिवसेनेच्याही संपर्कात?  title=

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली असतानाच एक अनपेक्षित प्रकार समोर आला आहे. उदयनराजे भोसले यांनी शनिवारी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ गुप्त खलबते झाली. त्यामुळे आता उदयनराजे शिवसेनेच्याही संपर्कात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

वरूण सरदेसाई यांनी या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. मात्र, सध्याच्या राजकारणाचा एकूणच अनिश्चित बाज पाहता उदयनराजे यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यताही नाकारता येणार नाही. 

राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय - उदयनराजे भोसले

लोकसभा निवडणुकीपूर्वीच उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली होती. यावरून साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्यासमोर नाराजीही व्यक्त केली होती. उदयनराजे जिल्ह्यातील इतर नेत्यांशी फटकून वागत असल्याचे या नेत्यांनी सांगितले. मात्र, तेव्हा शरद पवार यांनी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्यादृष्टीने उदयनराजेंबाबत सबुरीची भूमिका घेतली होती. 

मात्र, आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर साताऱ्यातील स्थानिक राजकारण पुन्हा उफाळून आले आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, आता वरुण सरदेसाईंच्या भेटीने ही समीकरणे पूर्णत: बदलण्याची शक्यता आहे.