राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय - उदयनराजे भोसले

 संभाजी भिडे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली.  

Updated: Aug 30, 2019, 06:25 PM IST
राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय - उदयनराजे भोसले title=
संग्रहित छाया

सातारा : राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी दिलीय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या ठिकाणी ही भेट झाली. ही भेट कौटुंबिक असल्याची प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली. शिवेंद्रराजेंपाठेपाठ आता उदयनराजेंही भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र याबाबतच्या प्रश्नाला उदयनराजेंनी थेट उत्तर देणे टाळले.

दरम्यान, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी उदयनराजे प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जात आहेत, अशी चर्चा आहे. भाजपच्या प्रयत्नांना जर यश आले तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का असेल. तसेच हक्काचा सातारा जिल्हा देखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून जाईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत, उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच होईल . त्यांना यायचं की नाही सर्वस्वी निर्णय उदयनराजे यांचाच असेल.