उल्हासनगरमध्ये कारच्या धडकेत तिघे ठार; आलिशान गाडीने रिक्षाचा केला चुराडा

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेनंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आकाश नेटके | Updated: Dec 18, 2023, 09:18 AM IST
उल्हासनगरमध्ये कारच्या धडकेत तिघे ठार; आलिशान गाडीने रिक्षाचा केला चुराडा title=

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघातातच आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Accident) आणखी एक मोठा अपघात घडलाय. उल्हासनगरमध्ये झालेल्या भीषण अपघात तीन जण ठार झाले आहेत. एका भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

उल्हासनगरमध्ये झालेल्या या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत. भरधाव कारने रिक्षा आणि इतर गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. कारचालक हा मध्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती मिळत आहे. उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेनंतर कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कल्याण नगर महामार्गावर विचित्र अपघात, 8 ठार

कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत मोठा अपघात घडला आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक, पिकअप आणि रिक्षा यांच्या धडकेनंतर हा अपघात घडला. पिकअप गाडी नगरकडून कल्याणच्या दिशेने जात होती. तर रिक्षा कल्याणकडून नगरच्या दिशेने जात होती. तर ट्रकदेखील कल्याणकडून नगरच्या दिशेने जात असताना या तिन्ही वाहनांची समोरा समोर जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती तिन्ही वाहनांचा अक्षरक्षः चुराडा झाला.

अपघातात गणेश मस्करे, कोमल मस्करे, हर्षद मस्करे, काव्या मस्करे, नरेश दिवटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू. अपघातात पिकअप मधील एकाच कुटूंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये ४ वर्षाच्या मुलाचा आणि ६ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. रिक्षामधील चार प्रवाशांचा ही जागीच मृत्यू. रिक्षा चालक नरेश दिवटेची ओळख पटली असून रिक्षातील इतर तीन प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम ओतूर पोलिसांकडून सुरू आहे. पिकअपमधील चारही मृत्य हे जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव चे रहिवाशी आहेत.