मुंबई : बदलापूरमध्ये योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. बदलापूर रेल्वे स्थानकात अनेक दिशेने रेल्वे प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून येत असतात. थोडा वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी अनेक प्रवासी या जीवघेण्या मार्गाचा वापर करतात. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना विविध संदेश देणाऱ्या राख्या बांधल्या. चालत्या रेल्वेत चढू अथवा उतरू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका असे संदेश लिहले होते.
सणवार विसरून शहराचे रक्षण करणारे पोलीस आणि कोणत्याही प्रसंगी धावून जाणारे अग्निशमन दलाचे जवान यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत मुलुंडच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी जवानांना राख्या बांधल्या. उन असो वा पाउस नेहमीच अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलिस हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात. कायम रक्षण करणाऱ्या या भावांना राख्या बांधण्यात आल्या.
रक्षाबंधननिमित्त बाजारपेठा फुलल्याअसून विविध प्रकारातली आणि विविध फ्लेवरची मिठाई बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलीय. मात्र बाजारात चक्क नऊ हजार रुपये किलो किंमतीची मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. नाशिकच्या सुप्रसिद्ध सागर स्विट्समध्ये ही मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आलीय. यात मिठाई, पेढे, बिस्कीट, काजू कतली अशा मिठाईच्या प्रकारात २४ कॅरेट सोन्याचा वर्ख करण्यात आला आहे. रक्षाबंधननिमित्त ही मिठाई तयार करण्यात आली असून, मिठाईला चांगला प्रतिसाद मिळत आहे.