प्रथमेश तावडे, झी मीडिया
Vasai Murder News: वसईत एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने प्रेयशीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीची हत्या करतानाचा लाइव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. लोखंडी पाना डोक्यात मारून ही हत्या करण्यात आली आहे. हत्या करताना बघ्याची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती पण कोणीही तरुणीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली होती. जर वेळीच तरुणाला रोखण्यात आले असते तर आज हा प्रकार घडला नसता.
सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पोलीस तपास करीत आहेत. भररस्त्यात अशा प्रकारे हत्येचा गुन्हा घडल्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. अगदी रस्त्याच्या मधोमधच आरोपीने तिच्यावर वार केले. तिच्यावर वार करत असताना तो सतत माझ्यासोबत असं का केलं? असा प्रश्न विचारत होता, असं प्रत्यशदर्शींनी सांगितले आहे. मात्र आरोपी जेव्हा तरुणीवर निर्घृणपणे वार करत होता तेव्हा तिथील एकाही नागरिकांची पुढे यायची हिंमत झाली नाही. आरोपी प्रचंड त्वेषाने प्रेयसीवर वार करत होता. हे हत्याकांड घडत असताना बाजूने मोटारसायकलवरुन नागरिक जात होते. मात्र कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढं आलं नाही. काहीजण या घटनेचा व्हिडिओ शूट करताना दिसत होते.
व्हिडिओत दिसत आहे की, तरुणी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तर, आरोपी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवताना दिसत आहे. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासणी सुरू आहे.
वसईच्या या घटनेने दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत प्रियकराने 16 वर्षांच्या प्रेयसीला चाकूने भोसकले होते. आरोपीने तरुणीवर चाकुचे 40 वार केले होते. जिथे हत्याकांड घडले तिथे लोक आजूबाजूने जात होते, मात्र काहीच घडलं नाही अशा अविर्भावात दुर्लक्ष करुन निघून जात होते. कोणीही धाडस करत अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता तब्बल एक वर्षांनंतर वसईतदेखील घडलेल्या या घटनेने दिल्ली हत्याकांडचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.