नाशिक : लखलखत्या दीपोत्सवाला आजपासून सुरुवात होतेय. अश्विन कृष्ण द्वादशी अर्थात गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणापासून खर तर दिवाळीला खरी सुरुवात होत असते.
गाय आणि वासराच्या पूजेचं महत्त्व असलेला वसुबारस हा दिवाळीच्या दिवसांपैकी पहिला दिवस. या दिवशी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
ज्यांच्याकडे घरी गाय, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी घरातील महिला गायीच्या पायावर पाणी घालतात. गायीला वस्त्र अर्पण करतात.
शिंगे व खुरांना हळद-कुंकू, फुलं, अक्षता वाहून, गायीचं आणि वासराचे औक्षण करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो. गोशाळांमार्फतही वसुबारस पूजेचे आयोजनही करण्यात येते.