मावळची सत्ता कोणाकडे?

मावळ मतदारसंघ म्हणजे अर्धे पुणे आणि अर्धे कोकण... पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले पनवेल, उरण आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये मोडतात. 

Updated: Jun 13, 2018, 11:19 PM IST
मावळची सत्ता कोणाकडे? title=

मावळ : मावळ मतदारसंघ म्हणजे अर्धे पुणे आणि अर्धे कोकण... पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले पनवेल, उरण आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये मोडतात.  गेल्या लोकसभा निवणुकीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवार शोधण्याची धावा धाव करावी लागली... अखेर राहुल नार्वेकर यांना पुढे करण्यात आलं... शिवसेनेकडून तत्कालिन विद्यमान खासदार गजानन बाबर यांना संधी मिळेल अशी शक्यता असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणे यांची वर्णी लागली. 

मोदीलाटेमध्ये बारणेंना अनपेक्षित विजयही मिळाला. त्यांनी यांनी जगताप यांच्यावर तब्ब्ल १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी विजय मिळवला... राष्ट्रवादीची पुरती धूळधाण झाली...! मात्र आता मतदारसंघातली स्थिती वेगळी आहे. या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व निर्माण झालंय... बारणे यांचे कट्टर विरोधक आणि उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी आता भाजप प्रवेश केलाय... युतीची शक्यता कमी असल्यामुळे भाजपनं बारणेंवर टीका सुरू केलीये. युती झालीच तर सलग दोन वेळा विजय मिळवल्या मुळे शिवसेना या मतदारसंघावर दावा सांगणार हे नक्की... मात्र भाजपा नेते हा मतदारसंघ आपला असल्याचा दावा करतायत. 

मावळ मतदारसंघात सहापैकी ४ आमदार भाजपाचे आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ आमदार आहे. त्यामुळे भाजपाला या मतदारसंघावर दावा करण्यासाठी सबळ कारण आहे... महापालिका निवडणुकांमध्ये मतदारसंघातल्या जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे... ती ही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढून... साधा सरळ हिशोब केला तरी विधानसभेला सहा ही मतदार संघात मिळून भाजपला ४ लाख ३७ हजार १६१ मते मिळाली तर शिव सेनेला दोन लाख ४६ हजार ७७५ मते मिळाली आहेत.. त्यामुळे युती झाली तरी ही जागा आम्ही सोडवून आणू असा दावा भाजप करतंय...! तर मोदी लाटेमुळे लोक भाजपच्या बरोबर होते, असं सांगत या जागेवरचा दावा सोडण्यास शिवसेनेनं स्पष्ट नकार दिलाय... 

कधीकाळी सर्वाधिक ताकदवान असलेल्या राष्ट्रवादीची मात्र या अत्यंत दयनीय स्तिथी झालीये...! असं असलं तरी आपण भाजपा-शिवसेनेला टक्कर देण्यास सक्षम असल्याचा दावा स्थानिक नेते करतायत. शेकापसोबत युती केल्यामुळे कोकणात पक्षाची ताकत वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता गेली असली तरी दोन नंबर राष्ट्रवादी आहे आणि जे उरलेत ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत, असा नेत्यांचा दावा आहे. 

अर्धा कोकणात आणि अर्धा पुणे जिल्ह्यात असलेल्या या मतदारसंघात उमेदवार कुठला आहे, यालाह महत्त्व आहे. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वच पक्षांनी आतापर्यंत पिंपरी-चिंचवडचे उमेदवार दिलेत. आताही शिव सेनेकडून श्रीरंग बारणे, भाजपकडून लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीकडून संजोग वाघेरे यांची नावं चर्चेत आहेत. भाजपचे उरणचे महेश बालदी आणि पनवेलच्या रामशेठ ठाकूर यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. या मतदारसंघाचं चित्र हे बहुतांश युतीच्या भवितव्यावर अवलंबून आहे...