Vegetable Price Hike : श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेक सणवारांची चाहूल लागते, उपवासांची सत्र सुरू होतात आणि मग अनेक घरांमध्ये उपवासाच्या फराळासाठीची लगबग सुरू होते. या महिन्यादरम्यान अनेक मंडळी मांसाहाराचा त्याग करून शाका हाराकडे वळत असल्यामुळं बहुतांश घरांमध्ये शाकाहारी स्वयंपाकाला प्राधान्य दिलं जातं. दिवसरात्र विविध प्रकारची व्यंजनं आणि पंगती उठतात. पण, आता मात्र स्वयंपाकघराचा ताबा असणाऱ्या आणि कुटुंबाचं मासिक बजेट सांभाळणाऱ्या प्रत्येकाचीच चिंता वाढणार आहे, कारण ठरतंय ते म्हणजे भाज्यांच्या दरांमध्ये होणारे चढ- उतार.
ऐन श्रावणात आणि सणवारांच्या दिवसांमध्येच मागणी वाढल्यामुळं भेंडी, गवार, फ्लॉवर, वांगी, मटार यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पुवरवठा पुरेसा असल्यामुळं शेवगा, घेवड्याच्या दरात मात्र घट झाली असून, इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
कोथिंबीर, मुळा, चवळई, चाकवत, पालकचे दर स्थिर आहेत. तर, कांदापात, पुदिना, अंबाडी, चुका, राजगिऱ्याच्या दरात घट झाली आहे. पावसाने उसंत घेतल्यामुळं पालेभाज्यांची आवक वाढली आहे. घाऊक बाजारपेठांमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, इंदूर, आग्रा, पुणे, सातारा इथून भाज्यांचे ट्रक दाखल झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
घाऊक बाजारात (शेकडा) पालेभाज्यांचे दर खालीलप्रमाणे
पालेभाजी | दर (शेकडा)/ रुपये |
कोथिंबीर | 1000 ते 1500 |
मेथी | 800 ते 1500 |
शेपू | 800 ते 100 |
कांदापात | 800 ते 1200 |
करडई | 400 ते 700 |
चाकवत | 400 ते 700 |
मुळा | 800 ते 1500 |
राजगिरा | 400 ते 700 |
चुका | 500 ते 700 |
चवळई | 400 ते 700 |
पालक | 800 ते 1500 |
पावसाच्या या मोसमामध्ये बहुतांश भाज्या 40 रुपये प्रति किलोहून अधिकच्याच दरानं विक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाज्यांचे दर आणि भाजीपाला उत्पादकांचा नफा या साऱ्याचं मोठं गणित यामागं असल्याची बाब समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते भाजीपाला साठवून ठेवण्याची अनेक तंत्र उपलब्ध असल्यामुळं शेतकरी तो किमान दरात विक्री करताना दिसत नसून त्यामुळं भाजीपाला चढ्या दरात विक्री होताना उत्पादकांना याचा फायदा होताना दिसत आहे.
सातत्यानं होणारे हवामान बदल, पावसाचं कमीजास्त प्रमाण आणि ग्राहकांची मागणी या साऱ्यांचे परिणाम भाजीपाल्याच्या आणि फळांच्या दरांवर होताना दिसत असून, पुढील काही दिवस हे दर असेच राहण्याची शक्यता असल्यामुळं यंदाचा श्रावण सामान्यांना महागाईचा फटका बसणार हे नाकारता येत नाही.