Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाल्या क्षणापासून यंदाच्या वर्षी हा वरुणराजा अगदी मनमराद बरसल्याचं पाहायला मिळालं.   

सायली पाटील | Updated: Aug 12, 2024, 06:47 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी पाहून थक्क व्हाल; पुढील 24 तासांत कसं असेल पर्जन्यमान?  title=
Maharashtra Weather news less rain in mumbai and Konkan heavy rainfall predictions in vidarbha

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये साधारण मागील आठवड्याभरापासूनच्या काळात पावसानं टप्प्याटप्प्यानं उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं. मान्सूननं कोकण किनारपट्टीपासून अगदी मुंबई शहर आणि उपनगरामध्येही उसंत घेतलेली असतानाच विदर्भ मात्र या साऱ्याला अपवाद ठरला आहे. पुढील 24 तासांमध्ये विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून, या भागामध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

तिथं उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस चांगलीच विश्रांती घेताना दिसणार असून, बहुतांश भागांमध्ये ऊन्हाचे कवडसे आणि ढगांचा लपंडाव पाहता येणार आहे.

हवामान आणि कमी दाबाच्या पट्ट्याची एकंदर स्थिती पाहता मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा दिल्लीपासून बंगालच्या उपसागराच्या ईशान्येपर्यंत सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही सध्या कर्नाटक ते महाराष्ट्रादरम्यान सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा मात्र विरल्यामुळं पर्जन्यमानात घट झाल्याचं स्पष्ट होत आहे. 

आतपर्यंतच्या पावसाची टक्केवारी 

मागील काही दिवसांपासून पर्जन्यमानाची आकडेवारी खालावलेली असतानाच यंदाच्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत साधारण 123 टक्के पावऊस झाला आहे. आकडेवारीनुसार म्हणावं तर, एव्हाना सरासरी 640 मिलीमीटर पाऊस होणं अपेक्षित असतं. पण, यंदा मात्र ही आकडेवारी वाढून थेट 792 मिमीच्याही पुढे गेली आहे. 

जून महिन्यापासून पर्जन्यमान मोजल्यास 105.7 मिमी, जुलै महिन्यात 144.8 मिमी आणि ऑगस्ट महिन्यात 92.9 मिमी (सुरुवातीचे 11 दिवस) इतका पाऊस झाला. थोडक्यात यंदा पावसाची टक्केवारी पाहता तो बाजी मारताना दिसत आहे असं म्हणणं वावगं नाही.