श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमधील नागरिकांना लाल फितीच्या कारभाराचा अनुभव आला आहे. शहराला अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे होतेय. तसेच कालमर्यादा संपून 2 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यानंतरही काम पूर्णत्वास आलेले नाही. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत शिवसेनेने जीवन प्राधिकरण कार्यालय राडा घातला. (Vidarbha Shiv Sainiks lock Maharashtra Jeevan Pradhikaran office in Yavatmal)
शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात खुर्चीवर पाणी फेकून, अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याचा आरोप करीत खुर्च्या फेकल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांना कार्यालय बाहेर काढून प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. शिवसेना शहराध्यक्ष नगरसेवक पिंटू बांगर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. अमृत योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदारास काळया यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या योजनेच्या कामांमुळे शहरातील संपूर्ण रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. पाच वेळा योजनेची पाईपलाईन फुटली आहे. पाण्याच्या टाक्या देखील पूर्ण झालेल्या नाहीत. या सर्व गोष्टींचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून शहरवासीयांना अत्यंत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून होत असलेल्या अमृत योजनेची कामं होऊ देणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
यवतमाळ शहराला निळोणा तसेच चापडोह धरणातून पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरातील लोकसंख्या मोठया प्रमाणात वाढल्याने आता या दोन्ही धरणातील पाणी सुध्दा शहराला कमी पडायला लागले आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने 302 कोटीचा निधी देऊन अमृत योजना मंजुर केली.
या योजनेचे काम नाशिकमधील आळके कंपनीला मिळाले. कामाचा कालावधी संपला तरी पाईप लाईन टाकण्याचे तसेच त्याच्या टेस्टींग चे काम सुरु आहे. याआधीही चाचणीदरम्यान टाकळी तसेच गळव्हा येथे पाईप लाईन फुटल्यान शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
या योजनेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला असतानाही एकही अधिकारी खुलासा करायला तयार नाही. सदर कंत्राटदाराने मिळालेले हे काम इतर कंत्राटदारांना दिले असून त्यांना अशा कामाचा अनुभव नसल्याने हे काम अत्यंत सुमार असल्याचे दिसून येत आहे.
पाईप बुजविण्यासाठी खोदलेल्या नाल्या तशाच ठेवल्याने अनेक अपघात घडून नागरीक जखमी झाले आहे. त्यामुळे या संपुर्ण कामाची आहे त्या स्थितीत क्वॉलीटी कंट्रोल कडून तपासणी करणे गरजेचे आहे. कामाला उशीर होत असल्यामुळे संबंधीत कंत्राटदाराला याआधी दंड सुध्दा करण्यात आला. मात्र त्यानंतरही कामाची गती वाढलेली नाही.
यवतमाळात दहा ते पंधरा दिवसआड पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे लाखो नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. समज देण्यापासून तर दंड करण्यापर्यंत सर्व उपाययोजना करुन झाल्या. पण कंत्राटदार ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, असं निवेदन पिंटू बांगर यांनी मुख्यमंत्रांना पाठविलं.
भाजप पदाधिकाऱ्यांचे भ्रष्ट कंत्राटदारांना पाठबळ
भाजपचे पदाधिकारी अमृत योजनेच्या कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. सदर योजनेची चौकशी होईपर्यंत कंत्राटदारला कुठलेही देयके अदा करण्यात येऊ नये. नगरपालिकेत नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. त्यामुळे दोष नसताना रोष मात्र नगराध्यक्षावर काढण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अमृत योजनेच्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करुन त्याला काळया यादीत टाका अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक पिंटू बांगर यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांचं खत अनुदान व्यापारीच लुटतायत, खत खरेदीनंतरचा मेसेज नीट तपासून पाहा !