गंगापूर, औरंगाबाद : गोदावरी नदीत उडी घेऊन जीव गमावलेल्या मराठा मोर्चातील आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यविधीसाठी पोहचलेल्या शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना जनतेच्या रोषाला बळी पडावं लागलंय. शिंदे यांच्या मृत्यूनंतर गंगापूरमध्ये दाखल झालेल्या खैरे यांना धक्काबुक्की आणि मारहाणही करण्यात आली.
गंगापूरमध्ये दाखल झालेल्या शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांच्या अंगावर जमाव अचानक धाऊन आला. राजकारणी नेत्यांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याचं म्हणत त्यांनी नेत्यांना अडवलं... परंतु, तरीही खैरेंनी शिंदे यांच्या अंत्यदर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेला जमाव खैरे यांच्या अंगावर धावून गेला... आणि त्यांनी खैरेंना धक्काबुक्कीही केली... घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणेनं प्रसंगावधान राखत खैरे यांना घटनास्थळावरून माघारी धाडलं...
गंगापूर तालुक्यातल्या कायगाव टोक्यावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरीच्या पात्रात उडी मारली. तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र, उपचारादरम्यान काकासाहेब शिंदेचा मृत्यू झाला. सरकारनं काकासाहेब शिंदेच्या कुटुंबियांना सरकारनं १० लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. शिवाय शिंदे यांच्या धाकट्या भावाला सरकारी नोकरीचं आश्वासनही दिलं. या आश्वासनानंतर शिंदे कुटुबियांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. त्यांच्या पार्थिवावर गंगापूरच्या कायगाव टोक इथं अंत्यसंस्कार पार पडले.
काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी गंगापूरचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. दरम्यान, सुरक्षितता म्हणून आज जिल्ह्यात पोलिसांनी इंटरनेट सेवा बंद ठेवलीय.
दरम्यान, गंगापूर येथील घटना दुर्दैवी आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक आणि गंभीर प्रयत्न राज्य सरकार करते आहे. ही घटना दुर्दैवी असल्याने त्या कुटुंबाला संपूर्ण मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तथापि कुठलीही हिंसा होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.