पालघर : महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलीनं त्यांचा अंत्यविधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर उरकला. या महिलेची मुलगी गुजरातमध्ये राहते... कुरिअर करूनच आपल्याला आईच्या अस्थी गुजरातला धाडून द्याव्यात, अशी विनंतीही तिनं केलीय.
सरकारी कामांपासून ते छोट्या छोट्या गोष्टींच्या खरेदीपर्यंत जवळपास सर्वच गोष्टी आजकाल इंटरनेवर सहज मिळतात. परंतु, आपल्या आईचा अंत्यविधीही ऑनलाईन उरकणारी ही मुलगी सध्या या भागातील चर्चेचा विषय ठरलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोर स्थित धीरज पटेल यांची पत्नी निरीबाई पटेल यांचा मृत्यू झाला. या जोडप्याची एककुलती एक मुलगी विवाहानंतर अहमदाबादमध्ये राहतेय. मंगळवारी धीरज पटेल एका कामानिमित्तानं बाहेर पडले असताना त्यांच्या पत्नीचा घरात मृत्यू झाला.
आजूबाजूच्या नागरिकांना या घटनेची माहिती समजताच घरी कुणीही उपस्थित नसताना भागातील हिंदू-मुस्लीम समाजातील अनेक लोक इथं जमा झाले. त्यांनी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीला कॉल करून या घटनेची माहिती दिली...
परंतु, मुलीनं मात्र अंत्यविधीसाठी उपस्थित राहणं शक्य होणार नाही असं गावकऱ्यांना सांगितलं. तुम्हीच अंत्यविधी करून मला व्हिडिओ कॉलिंगवर अंतिम दर्शन करून द्या, अशीही विनंती तिनं या लोकांना केली.
त्यामुळे, गावकऱ्यांनीच निरीबाई यांचा अंत्यविधी उरकून व्हिडिओ कॉलिंगवर त्यांच्या मुलीला अंत्यदर्शनही उपलब्ध करून दिलं. ही घटना या गावातील चर्चेचा विषय ठरलीय.