Viral News : समुद्र म्हणजे मासेमारांचा पोशिंदा. याच समुद्रावर कोळी, मासेमार बांधवांचा उदरनिर्वाह चालतो. हाच समुद्र खऱ्या अर्थानं राज्यातील आणि देशातील कैक मासेमार कुटुंबांचा खमका आधार आहे. अशा या दर्यानं डहाणूतील काही मासेमारांना रातोरात लखपती केलं आहे. कारण, भर समुद्रातच या मासेमारांना खऱ्या अर्थानं लॉटरी लागली.
डहाणू तालुक्यातील वाढवणे परिसराती असणाऱ्या मच्छीमारांच्या मासेमारीसाठी समुद्रात गेलं असता जाळ्यात लाखो रुपयांचे घोळ मासे सापडले. ऐन सणासुदीच्या आणि त्यातही होळीच्या दिवसांत हा धनलाभ झाल्यामुळे मच्छीमारांमध्ये आनंदाचं उधाण पाहायला मिळालं.
घोळ मासा मिळण्यासाठी राज्यातील काही किनारे ओळखले जातात. पण, मागील काही वर्षांचा आकडा पाहता डहाणू तालुक्यातील समुद्रात घोळ मासा मिळण्याचं प्रमाण मात्र तुलनेनं कमी आहे. असं असलं तरीही मागचा आठवडा यास अपवाद ठरला.
डहाणूला लाभलेल्या किनारपट्टी भागातील खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे. पण, काही अंतरावर मात्र मासेमारी केली जात आहे. त्यातच घोळ मासे सहसा थव्यानं अर्थात अनेक घोळींच्या साथीनं समुद्रात फिरत असतात. परिणामी जिथं जाळं टाकण्यात आलं होतं तिथंच घोळ माशांचा थवा आला आणि मासेमारांचं नशीब पालटलं. काही दिवसांपासून मच्छीमारांना वाढवण हद्दीत येणाऱ्या समुद्रात मोठ्या प्रमाणात घोळ मासे मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाढवण हद्दीतील समुद्रात मासेमारांना मोठ्या प्रमाणात घोळ मासे मिळण्यास सुरुवात झाली. मासेमारीच्या कामात मग्न असतानाच डहाणू खाडी आणि सातपाटी भागातील येथील मच्छीमारांच्या जाळ्याला लाखो रुपयांची किंमत मिळतील इतके किमतीचे घोळ मासे लागले.
मासेमारांच्या जाळ्यात शनिवारी एकदोन नव्हे, तब्बल 200 घोळ मासे लागले. सोमवारीसुद्धा त्याच भागामध्ये इतर तीन ते चार मच्छीमारांचंही नशीब पालटलंय कारण, त्यांच्याही जाळ्याला घोळ मासे लागले. कोणाला 113, कोणाला 88 तर कोणाला 43 असे घोळ मासे येथील मासेमारांच्या जाळ्यात सापडले. बाजारभावानुसार घोळ माशाची विक्री 600 रुपये किलो दरानं होते. त्यामुळं या एकूण माशांचा आकडा आणि त्यांचं वजन पाहता मासेमारांना घसघशीत रक्कम मिळाली असणार यात शंका नाही.