बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, आजारी मुलीला शारिरीक संबंधाचा सल्ला

 बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Updated: Sep 22, 2021, 09:48 PM IST
बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, आजारी मुलीला शारिरीक संबंधाचा सल्ला

प्रथमेश तावडे, झी 24 तास, विरार : कोविड काळात डॉक्टरांनी अहोरात्र काम करत सेवा दिली आहे. डॉक्टरांना आपण देव मानतो. पण काही जणांकडून डॉक्टरकीच्या नावाखाली सामान्य लोकांना लुबाडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. डॉक्टर असल्याची बतावणी करुन बोगस डॉक्टरने एका मुलीला आजारातून बरं होण्यासाठी घाणेरडा आणि तितकाच संतापजनक सल्ला दिला. (virar police arrestesd bogus doctor of kailas mantri) 

नेमकी घटना काय?

कैलास मंत्री हा व्यक्ती डॉक्टर असल्याची बतावणी करुन इंटरनेटवरचं कंटेट चोरून ते आपल्या नावाखाली यू ट्यूब चॅनेलवर प्रसारीत करत होता. विरारमध्ये बोळींज परिसरात या बोगस सायकोलॉजिस्ट डॉक्टर दवाखानाही थाटला होता. त्याचे यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून हैद्राबादमधील एक तरुणी त्याच्याकडून स्किजोफ्रेनियावर उपचार घेत होती.

बोगस डॉक्टरने मुलीला बरं करण्याचं आश्वासन देऊन उपाचाराच्या नावाखाली मुलीच्या कुटुंबियांकडून तब्बल 9 लाख रुपये उकळले. इतकंच नाही तर या मुलीला त्याने शारिरीक संबंध ठेवण्याचा सल्लाही दिला होता. 

कुटुंबाला संशय

बोगस डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांना संशय आला. त्यांनी विरारचं अर्नाळा पोलीस ठाणे गाठलं. बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.