औरंगाबाद : कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु झालीये. पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच बसायला लागलीये, टँकर आला की उडते ती पाण्यासाठीची झुंबड. एकट्या औरंगाबादेत सध्या घडीला ३२४ टँकर सुरु आहे. पाहूयात औरंगाबादेतील अशाच टँकरवर अवलंबून असलेल्या एका गावाचं चित्र. टँकर गावात आला की त्याच्याभोवती अशी गर्दी व्हायला सुरुवात होते, सुरु होते ती पाणी भरण्यासाठी धडपड, प्रसंगी रेटारेटी...
मात्र प्रत्येकाची धडपड असते ती फक्त पाणी भरण्याची. औरंगाबाद जिल्ह्यातील चितेगावचं हे आता रोजचंच दृष्य. गावातील एका भागात टँकर आला की दुस-यांदा थेट तीन दिवसानं त्यामुळं पाण्यासाठी ही रोजचीच कसरत गावक-यांना करावी लागते. काही ठिकाणी तर टँकरमधून पाणी ड्रममध्ये टाकल्या जातं आणि त्यानंतर त्यातून भांड्यान ते पाणी गावकरी घरी नेतात. कहर म्हणजे टँकर येण्याचीही वेळ दुपारी १२नंतर म्हणजे कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी पाण्यासाठी कडाक्याची भांडण होतात म्हणून परिसरातील विहीरीत टँकर रिकामा केला जातो. टँकर नाही आला तर मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी जाव लागतं, मग घरातील मोठे असो वा छोटे सगळेच पाण्यासाठी रस्त्यावर.
उन्हाचा कडाका जसाजसा वाढत चाललाय, तशी तशी पाण्याची अडचण वाढतच चालली आहे. लोकांच्या मागणीनुसार टँकरची सोय केली जाते, असं स्थानिक अधिकारी सांगतात. मराठवाड्यातील एकूण प्रकल्पात आता २२ टक्क्यांवर पाणीसाठा आहे. तर टंचाईग्रस्त गावात ३२४ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामुळं येणारा मे महिना पाणी टंचाईत होरपळणा-या नागरिकांची परीक्षा पाहणारा ठरणार असंच चित्र या परिस्थितीवरून दिसतंय.