जळगाव : राज्याचे जलसंपदा तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सलग दुस-या वर्षीही दिवाळीचा सण दुर्गम आदिवासी पाड्यांमधल्या आदिवासींसोबत साजरा केला.
गिरीश महाजन यांनी कुटुंबीयांसह जळगाव जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन, आदिवासींसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
सातपुड्यातल्या पाल, यावल अभयारण्यामधल्या गाडऱ्या जामन्या, गारखेडा, उसमळी, लंगडयाअंबा परिसरातल्या, दुर्गम भागातल्या वाड्यापाड्यांवर आजही जायला धड पक्के रस्ते नाहीत. दिवाळी काय असते हेही या पाड्यांवरच्या आदिवासींना माहित नाही. अशा गावांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करण्याचा संकल्प जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता.
आदिवासींसोबत पारंपरिक नृत्य करत गिरीश महाजनांनी दिवाली साजरी केली. सोबतच उसमळी पाड्यावर फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करत वेगळा पायंडाही पाडला. तर रात्री मुक्कामी थांबून महाजन यांनी आदिवासींसोबत स्नेहभोजनही घेतलं.