कितीही पक्ष एकत्र आले तरी सगळ्यांना धूळ चारू - गडकरी

सगळे विरोधक एकत्र आले तरी हरवू, असे प्रतिवादन केंद्रीय  मंत्री  नितीन गडकरी यांनी केले आहे. 

Updated: Jan 19, 2019, 09:50 PM IST
कितीही पक्ष एकत्र आले तरी सगळ्यांना धूळ चारू - गडकरी title=

नागपूर : सगळे विरोधक एकत्र आले तरी हरवू, असे प्रतिवादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केले आहे. कोलकाता येथे सर्व पक्षीय नेत्यांनी भाजप अर्थात मोदींच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावर गडकरी म्हणालेत, कितीही पक्ष एकत्र आले तरी सगळ्यांना धूळ चारू. माणूस हा जातीने मोठा होत नाही, नागपुरात जातीचे राजकारण चालत नाही, असे म्हणत गडकरी यांनी आपण जात-पात मानत नसल्याचे स्पष्ट केले. 

भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मार्गदर्शन करताना गडकरी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे, असा विरोधकांकडून आरोप करण्यात येत होता. याला उत्तर गडकरींनी दिले आहे. माझ्याकडे कोणीही जातीचे राजकारण करायला आले तर त्याला मी प्रतिसाद दिला नाही. नागपुरातील अनुसूचित समाज कायमच भाजपासोबत राहिला आहे, कारण नागपुरात जातीचे राजकारण चालत, हे यावरुन स्पष्टे होते, असे गडकरी म्हणालेत.

काँग्रेसने आमच्याबद्दल अपप्रचार केला. भाजपा हा उच्च जातीच्या लोकांचा पक्ष आहे. काँग्रेसने हा भ्रम पसरवला आहे. मात्र आम्ही सामाजिक समानता मानणारी माणसे आहोत. त्याच धोरणावर आम्ही काम करतो, असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले. राजकारणात एक नियम आहे कनव्हिन्स करता आले नाही तर कनफ्युज करा, काँग्रेसकडून हीच नीती वापरली जात आहे, असा हल्लाबोल गडकरींनी काँग्रेसवर केला. दरम्यान, गडकरींनी यावेळी एक इशारा दिला. देशाच्या सुरक्षेला जो कोणी धक्का लावेल त्याची गय करणार नाही, असे ते म्हणालेत.