Cyclone Mocha Weather Updates in Maharashtra: हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता आता वेधशाळेकडूनही दर दिवशी या परिस्थितीचा आढावा घेत त्या अनुषंगानं नागरिकांना वेळोवेळी सतर्क केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या चक्रिवादळाची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती, ते चक्रिवादळ आता पूर्णपणे सक्रिय होताना दिसत असून, यामुळं 9 मे 2023 म्हणजेच मंगळवारपासून कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होताना दिसणार असून, पुढच्याच दिवशी म्हणजे 10 मे पर्यंत त्याचं रुपांतर एका भयंकर चक्रिवादळामध्ये होणार आहे.
2023 या वर्षातील हे पहिलं चक्रिवादळ असून, बंगालच्या उपसागरावरून पुढे उत्तर पूर्व दिशेला या चक्रिवादळाचा प्रवास सुरु राहणार आहे. यादरम्यान, उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागावर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. बांगलादेशमध्येही या चक्रीवादळाचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. 8 ते 12 मे दरम्यान या वादळामुळं पश्चिम बंगालच्या मध्य भागालाही पावसाचा तडाखा बसेल, 13 ते 14 तारखेला या चक्रिवादळाचा लँडफॉल असेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये या वादळामुळं बरंच नुकसान होऊ शकतं अशा शब्दांतही हवामान विभागानं यंत्रणांना सतर्क केलं आहे. (weather Forecast today in maharashtra cyclone mocha Live tracking Rain predictions latest news )
महाराष्ट्राचं म्हणायचं झाल्यास राज्यावर या चक्रिवादळाचा थेट परिणाम होणार नसला तरीही ढगाळ वातावरण आणि अवकाळीचं सावट मात्र कायम राहणार आहे. शिवाय वादळ जसजसं पुढे सरकेल तसतसं देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागावर याचे परिणाम दिसू लागणार आहेत. परिणामी मंगळवार- बुधवारी अंदमान- निकोबार बेट समुहामध्ये मुसधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर आणि अंदमानला लागून असणाऱ्या किनारपट्टी भागासह इतर राज्यांना लागून असणारा समुद्रही खवळलेला असेल. ज्यामुळं मासेमार आणि लहान जहाजांना समुद्रातन न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या वादळाचा मान्सूनवर थेट परिणाम होणार नसून, फक्त वातावरण ढगाळ राहील असंच आयएमड़ीकडूनही सांगण्यात येत आहे.
पुढील 24 तासांमध्ये तामिळनाडू, तेलंगाणा, केरळ या राज्यांना आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला पावसाचा इशारा असतानाच तिथं देशातील पर्वतीय क्षेत्रांना बर्फवृष्टीचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम येथे हवामान बिघडल्यामुळं हिमवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम असेल अशी माहिती सध्याच्या घडीला हवामान विभागाकडून देण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या हिमाचल आणि नजीकच्या राज्यांमध्ये पर्यटनाला बहर आलेला असल्यामुळं तिथं पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यातच हवामान खबार झाल्यामुळं सोमवारी रोहतांग येथे असणाऱ्या अटल टनल या बोगद्यामध्ये साधारण 500 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर ही वाहनं आणि त्यात असणाऱ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम यंत्रणांनी हाती घेतलं. तिथं उत्तराखंडमध्येही हीच परिस्थिती असून, चारधाम यात्रेवर याचे थेट परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.