कोरोनाच्या सावटाखाली एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट

कोरोनाच्या सावटाखाली कसं झालं हे लग्न एकदा पाहाच...

Updated: Mar 19, 2020, 06:14 PM IST
कोरोनाच्या सावटाखाली एका लग्नाची आगळीवेगळी गोष्ट  title=
संग्रहित फोटो

लातूर : लातूरमध्ये कोरोनाच्या सावटाखाली एक आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला. काही मोजकेच पाहुणे, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या साक्षीने हुळमजगे-शेरकर कुटुंबियांनी विवाह सोहळा पार पडला. लग्नमंडपात येण्यापूर्वीच सर्वांना मास्क देऊन, त्यांच्या हातावर सॅनिटायझरही देण्यात आलं. नववधू-वरांनीही नमस्कार करूनच सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. कोरोनाच्या सावटाखालील आगळ्यावेगळं लग्न पार पडलं.

लातूरचा सुमित आणि उस्मानाबादची स्नेहा यांचा विवाह सोहळा जवळपास दोन महिन्यापूर्वी ठरविण्यात आला. यासाठी दीड ते दोन हजार पाहुण्यांना निमंत्रणाचा बेत आखला गेला. त्यासाठी लातूरच्या कस्तुराई मंगल कार्यालय निवडण्यात आलं. पत्रिका छापल्या, त्या वाटल्याही. मात्र अचानक कोरोना व्हायरसचं संकट उभं टाकलं. मग काय लग्न तर मोडता येत नव्हतं. अखेर वराकडील ५० आणि वधूकडील ५० पाहुणे मंडळी बोलावून लग्न करण्याचं ठरलं. 

मात्र कोरोनाच्या सावटाखाली होत असलेल्या शुभकार्यात विघ्न नको म्हणून येणाऱ्या पाहुण्यांची काळजी हुळमजगे कुटुंबीयांनी घेतली. लग्नमंडपात येण्यापूर्वीच पाहुण्यांना मास्क देण्यात आले, प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझरही लावण्यात आलं. कोरोनाच्या भीतीमुळे बाजारातील मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असताना मोठ्या मेहनतीने ते विवाहस्थळी आणण्यात आले. त्यानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी नव वर-वधूनेही मास्क लावून आणि नमस्कार करूनच सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. 

या विवाह सोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांची आणि नातेवाईकांची मास्क आणि सॅनिटायझर लावून काळजी घेण्यात येत होती. त्यामुळे एका आगळ्या-वेगळ्या लग्नाचा साक्षीदार होता आल्याची भावना उपस्थित नातेवाईक आणि पाहुण्यांमध्ये होती. 

लग्नमंडपात उपस्थित पाहुणे आणि नातेवाईक मास्क, रुमाल लावूनच हजर होते. तर जेवणातही मोजकेच पदार्थ बनवून या विवाह सोहळ्यात बनविण्यात आले होते. एकूणच कोरोनाच्या सावटाखालील मास्क आणि सॅनिटायझरच्या सानिध्यातील हा विवाह सोहळा अनेकांच्या स्मरणात राहिल एवढं मात्र नक्की.