नाशिक पालिकेत नक्की काय चाललेय? तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले अॅप बंद

 तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेले अॅप आता डाऊनलोड करता येत नाही.  हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. 

Updated: Apr 11, 2019, 05:57 PM IST
नाशिक पालिकेत नक्की काय चाललेय? तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले अॅप बंद title=

नाशिक : तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेले अॅप आता डाऊनलोड करता येत नाही. गेल्यावर्षी तयार करण्यात आलेले आणि सर्वाधिक चर्चेत ठरलेले 'एनएमई ई कनेक्ट अॅप' गूगलच्या प्ले स्टोअरवरून अचानक गायब झाले आहे. सध्या नव्याने डाऊनलोड करणाऱ्यांना ते उपलब्ध होत नाही. डाऊनलोड करण्यासाठीचा प्रयत्न केल्यानंतर थेट नवी मुंबई महापालिकेचे 'एनएमएसी' हे अॅप डाऊनलोड होत आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना जाच ठरणारे हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. 

ही सत्ताधारी भाजपची खेळी असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. या अॅपवरुन थेट तक्रार करता येत होती. त्यामुळे पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामात दिरंगाई करता येत नव्हती. त्यामुळे हे अॅप नागरिकांचे आवडते होते. तुकाराम मुंढे यांनी एक चांगला उपक्रम सुरु केला होता. मात्र, काही लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी तसेच पालिकेतील काही कामचुकार अधिकाऱ्यांनी या अॅपचा चोख बंदोबस्त केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात नागरिकांना काहीही करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

नाशिक पालिकेत सत्ता परिवर्तन झाले. आधी सत्ता मनसेची होती. मात्र मोदी लाटेत त्यांची सत्ता भाजपच्या हाती गेली. मात्र, या ठिकाणी म्हणावी तशी विकासकामे झालेली नाहीत. तसेच अनेक नगरसेवकांनी विकासकामांवर त्यांना मिळणारा निधी कर्चही केलेला नाही. त्यामुळे तोही पडून आहे. त्याचच काही अधिकारी आणि कर्मचारी हे काम करण्यास टाळाटाळ करत असतात. त्यामुळे हे अॅप अतिशय चांगले होते. परंतु तुकाराम मुंढे गेल्यानंतर याचा फायदा उचलत ते बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाप्रती आस्था नाही तर आपल्याला त्रासदायक ठरणारे अॅप बंद करण्याचा कामात रस असल्याचे यावरुन स्पष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.